२५ वर्षांपासून पोलीस पाटील नाही; रातांबी गाव प्रशासनाच्या विस्मरणात? ग्रामस्थांचा तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकाऱ्यांना जाब

संगमेश्वर, :सचिन पाटोळे 

दि.१२: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी या महसुली गावात गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असून प्रशासनाच्या उदासीन आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना आजही त्यांच्या गावाचा अधिकृत पोलीस पाटील कोण आहे, हेच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शासनाने वेळोवेळी पोलीस पाटील पद भरण्यासाठी जाहिराती काढल्या, मात्र गावात पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने हे पद रिक्तच राहिले. परंतु प्रश्न असा आहे की, तब्बल २५ वर्षे एखादे महत्त्वाचे पद रिक्त असताना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था नेमकी कोणती केली आणि तिची अधिकृत माहिती ग्रामस्थांना का देण्यात आली नाही?

यापूर्वी रातांबी गावाचा कार्यभार कुटगीरी गावाच्या पोलीस पाटलांकडे असल्याचे सांगितले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी रातांबी गावातील एका विषयासंदर्भात राजिवली गावातील पोलीस पाटलांनी बैठकीची नोटीस काढल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात कुटगीरी येथील पोलीस पाटलांकडे विचारणा केली असता, “आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही,” असे उत्तर मिळाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रातांबी गावाचा अधिकृत कार्यभार नेमका कोणाकडे आहे? राजिवली येथील पोलीस पाटील कोणत्या आदेशाच्या आधारे रातांबी गावात नोटीस काढत आहेत? महसूल प्रशासनाने याबाबत कोणताही अधिकृत आदेश ग्रामस्थांसमोर का ठेवलेला नाही? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची राहणार?

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात भांडण-तंटे, वादविवाद अथवा इतर प्रशासकीय बाबी उद्भवल्यास काही लोक कुटगीरी तर काही लोक राजिवली येथील पोलीस पाटलांकडे जातात. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावात संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

रातांबी ग्रामस्थांनी आता या प्रकरणी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २५ वर्षांपासून रखडलेल्या पोलीस पाटील पदाबाबत आणि सध्याच्या कार्यभाराबाबत स्पष्ट आदेश सार्वजनिक करावेत, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

“२५ वर्षे एक पद भरता येत नाही, कार्यभार कोणाकडे आहे हेही स्पष्ट होत नाही, मग प्रशासन नेमके करत तरी काय?” असा संतप्त सवाल आता रातांबीतील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.