इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
सलग १३ व्या वर्षी १५ टक्के लाभांश; नेट एनपीए शून्य
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २२ : इचलकरंजी येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. २१ जून २०२६) रोजी कृष्णा मल्टिपर्पज हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.
संचालक बाळासाहेब वरगाले यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. त्यानंतर संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेचे वसूल भागभांडवल ९२.०७ लाख रुपये असून राखीव व इतर निधी ५.७३ कोटी रुपये आहे. ठेवी २०.३९ कोटी रुपये, गुंतवणूक ११.४५ कोटी रुपये तर येणे कर्ज १६.२५ कोटी रुपये इतके आहे. संस्थेची थकबाकी केवळ ०.२१ टक्के असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. तसेच संस्था सलग १३ वर्षांपासून १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम राखत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी विषयपत्रिका व नोटीसचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.
यावेळी सहकार भारती इचलकरंजी महानगरचे अध्यक्ष विकास कामत व इंटकचे राजेंद्र वचाटे यांनी मार्गदर्शन केले. सभेला गजानन लोंढे, इरगोंडा पाटील, चंद्रकांत विंदगे, राजकुमार पाटील, दशरथ मोहिते, किशोर भुसारी, दत्तात्रय कुंभोजे, विलास कोरवी, वंडोपंत लाड, शोभा कडतारे, सुषमा पाटील, सुवर्णा स्वामी, महादेवी खोत यांच्यासह संस्थेचे संचालक दिलीप वणकुद्रे, सुभाष तोडकर, शशिकांत शेटके, विलास चव्हाण, सुभाष पाटील, नकुल झेले, आशिष पाटील, सुवर्णा म्हेतर, भारती शिंदे, अमर सडगर, धन्यकुमार पाटील व सागर मुसळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन संजय वठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वंदे मातरमने सभेची सांगता झाली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.