जामिनासाठी मदतीच्या नावाखाली २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पीएसआयविरुद्ध गुन्हा
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. २५ जून : जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अर्पणा सूर्यदेव जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ हातनोली (ता. तासगाव, जि. सांगली) येथील पीएसआय अर्पणा जाधव या शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. संबंधित तक्रारदार अटकेत असताना तपास व जामिनासाठी मदत करण्याच्या नावाखाली जाधव यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या वडिलांकडून यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारल्याचेही चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर तक्रारदार जामिनावर बाहेर आल्यानंतर उर्वरित लाचेची रक्कम मागितली जात असल्याची तक्रार एसीबी, कोल्हापूरकडे करण्यात आली होती.
या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, जाधव यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी बेकायदेशीररीत्या २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.