ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक: जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष  

 विकसित भारत – जी-राम-जी मिशनचा जिल्हास्तरीय शुभारंभ -विविध विकासकामांचाही शुभारंभ  

सांगली: अय्यान पटेल

दि.२: ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका पायाभूत सुविधा आणि हवामान बदलाशी संबंधित विशेष कामे या चार प्रमुख क्षेत्रांवर भर देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाच्या गरजांनुसार सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून लोकसहभागातून शाश्वत व दर्जेदार सार्वजनिक मालमत्ता निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले.

            विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) – (VB-G RAM G) योजनेचा सांगली जिल्हास्तरीय शुभारंभ आज वाळवा तालुक्यातील वशी येथे उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते प्रचार प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल रथाला हिरवा झेंडा दाखवून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. हा रथ तालुक्यात फिरून योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे.

            यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, वाळवा पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप कांबळे, तहसीलदार सारिका रासकर, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आली. त्यानंतर मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत उगले पाणंद रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन विहीर व जलतारा कामांचाही शुभारंभ करण्यात आला.

            जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, नागरिकांनी शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. संबंधित योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. लोकसहभागातून आणि अचूक नियोजनातून गावामध्येच दर्जेदार, शाश्वत आणि कायमस्वरूपी टिकणारी सार्वजनिक मालमत्ता निर्माण व्हावी, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि गावाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            उपजिल्हाधिकारी विजया यादव यांनी ‘विकसित भारत’ ही केवळ आर्थिक प्रगती नसून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्याची संकल्पना असल्याचे सांगितले. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टात महिलांचा वाढता सहभाग आणि सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

            उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. सभापती उदयसिंह पाटील यांनी विकसित भारत अभियानाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व तहसीलदार सारिका रासकर यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी योजनेची उद्दिष्टे स्पष्ट केली.

            कार्यक्रमास जिल्हा एमआयएस समन्वयक सहदेव वाघमोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार, तांत्रिक अधिकारी विकास शिंगटे, असीम तांबोळी, संगणक सहाय्यक मच्छिंद्र पाटील, प्रवीण शिंदे, जनार्दन गायकवाड, रोजगार सहाय्यक किरण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मुकुंद जाधव, सरपंच अमोल कुंभार, उपसरपंच सतीश पाटील, वाळवा तालुका रोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सुनील गावडे, ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सहाय्यक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

         

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.