भारत टेक्स 2026 मध्ये इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचा ठसा; स्वतंत्र पॅव्हेलियनला मान्यवरांची भेट
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१६ जुलै २०२६: भारत मंडपम, प्रगती मैदान येथे 14 ते 17 जुलैदरम्यान सुरू असलेल्या भारत टेक्स 2026 या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शनात महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांनी सहभाग नोंदवला आहे. जगातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल व्हॅल्यू चेन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदर्शनात देश-विदेशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उत्पादक, निर्यातदार, व्यापारी आणि खरेदीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
या प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्त्रोद्योग सचिव श्रीमती अंशू सिन्हा, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वस्त्रोद्योग आयुक्त श्री डेने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, उपायुक्त श्री दहुडकर तसेच अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
भारत टेक्स २०२६ मध्ये देशातील सर्व राज्यांसह व्यापारी प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून, महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचे सामर्थ्यही या प्रदर्शनातून प्रभावीपणे सादर करण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी तसेच आमदार अशोकराव माने यांनी इचलकरंजीच्या वस्त्रोद्योजकांनी उभारलेल्या स्वतंत्र पॅव्हेलियनला भेट देऊन तेथील उत्पादनांची पाहणी केली. त्यांनी उद्योजकांशी संवाद साधत वस्त्रोद्योगाच्या विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यातीच्या संधींबाबत चर्चा केली.
विशेष म्हणजे, इचलकरंजीतील सुमारे ३० वस्त्रोद्योजकांनी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग नोंदवला असून, आधुनिक कापड, तांत्रिक वस्त्रे आणि विविध उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. या सहभागामुळे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याची आणि निर्यात वाढविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली.
भारत टेक्स २०२६ मध्ये सुमारे १६०देशांतील प्रतिनिधी, ३५०० हून अधिक प्रदर्शक,७००० आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि १.३० लाखांहून अधिक व्यावसायिक अभ्यागत सहभागी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “5F – Farm to Fibre, Fibre to Factory, Factory to Fashion, Fashion to Foreign” या संकल्पनेवर आधारित हा जागतिक वस्त्रोद्योग महोत्सव उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.