शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; १.८५ लाखांच्या चार चोरीच्या दुचाकींसह चार आरोपी जेरबंद
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि. १६ जुलै २०२६ : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत चार आरोपींना अटक करून सुमारे १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे शोध पथकाला वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.
तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी महावीर धुळगोंड पाटील (रा. सरकार मळा, रांगोळी, ता. हातकणंगले), स्वप्नील बाळासो बबे (रा. धनगर मळा, मानकापूर, ता. निपाणी), अमोल शंकर पाटील (रा. बेडक्याळ, ता. निपाणी) आणि अनिल विरूपाक्ष राम (रा. पुजारी मळा, इचलकरंजी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन (एमएच-०९-एफके-०१६०), अॅक्टिव्हा (एमएच-०९-डीक्यू-८५९१), हिरो फॅशन प्रो (एमएच-०९-डीडब्ल्यू-०७७९) आणि स्लेंडर प्लस (केए-२२-एचडी-८४७७) या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या चोरीचे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तीन आणि कागल पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार सद्दाम सनदी, गणेश सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी आणि प्रमोद चव्हाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.