पिण्याच्या पाण्यासाठी पाच कुटुंबांचा संघर्ष; ३० जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा
प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात कुटगिरी-येडगेवाडीतील पाच कुटुंबीय आक्रमक
संगमेश्वर : नियाझ खान
दि.१८ जुलै २०२६ : संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कुटगिरी-येडगेवाडी येथील पाच कुटुंबे गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून, प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी, निवेदने व पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबीयांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर यांना निवेदन देत ३० जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, कुटगिरी-येडगेवाडीतील १४ कुटुंबांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरीवरून विनापरवाना खाजगी नळपाणी योजना सुरू केली होती. ही योजना सुरळीत सुरू असताना ऐन उन्हाळ्यात काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाइपलाइन तोडल्याने पाच कुटुंबांतील वयोवृद्धांसह अनेक नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि राजिवली ग्रामपंचायतीकडे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी राजिवली ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन सार्वजनिक विहिरीवरून स्वखर्चाने स्वतंत्र नळपाणी योजना उभारण्यास सुरुवात केली. मात्र, काही व्यक्तींनी बेकायदेशीर हरकती घेत पाइपलाइन टाकण्यास अडथळे निर्माण केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, विहिरीकडे जाणारी अनेक वर्षांपासूनची पारंपरिक पायवाट संबंधित शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केल्यामुळे बंद झाल्याने विहिरीपर्यंत पोहोचणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे पाच कुटुंबांवर पिण्याच्या पाण्याचे दुहेरी संकट ओढवले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
निवेदनात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, सार्वजनिक विहिरीवर विनापरवाना बसविण्यात आलेला पंप जप्त करावा, सामायिक जमिनीतून संमतीशिवाय टाकलेली पाइपलाइन तात्काळ हटवावी तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू असलेल्या नवीन नळपाणी योजनेचे काम तातडीने पूर्ण करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच, तोपर्यंत शासनाने पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ३० जुलैपासून पंचायत समिती संगमेश्वर कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी रामचंद्र येडगे, धोंडिबा येडगे, हरिश्चंद्र येडगे, शंकर येडगे, अनंत येडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.