पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी मिशन मोडवर काम करा पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: प्रविण भोसले 

दि.१ : शासनाच्या विविध योजना राबवत असताना एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.पंचायत समिती राधानगरी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकीत राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, उप सभापती अश्विनी चौगुले, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, गट विकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

     पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विविध विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेपासून जे लाभार्थी वंचित आहेत त्यांच्यासाठी शिबिरे आयोजित करून त्यांना लाभ द्या. प्रलंबित अर्जांचा निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्या, असे सांगून ते म्हणाले, पुरवठा विभागामार्फत गरजू लोकांना रेशन धान्य उपलब्ध करुन द्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी दिव्यागांना रेशन धान्य मिळत नाही, अशी तक्रार केली. यावर पुरवठा विभागांने आवश्यक निर्णय घ्यावा, दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी योजनेसह इतर योजनेंचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, राधानगरी परिसरात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असते त्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ करावा व शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला त्वरित मिळवून द्यावा, यासाठी महसूल व वन विभागांनी दर आठवड्याला बैठक घेऊन प्रलंबित विषय निकाली काढा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. अनेक तरुण मुलांमध्ये गांजा घेण्याचे प्रमाण वाढत असून समुपदेशन करुन थांबवण्याचा प्रयत्न करावा, राधानगरी परिसरात अंमली पदार्थ विरोधी कठोर कारवाई करा, नशामुक्त कोल्हापूर अभियान गतिमान करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागांनी राधानगरी तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करावे, असे सांगून आरोग्य उपकेंद्र स्तरावर सलाईन व इंजेक्शनची सोय येत्या महिन्याभरात करण्यात येईल. गारगोटी रुग्णालयाप्रमाणे इकोची सोय राधानगरी येथील रुग्णालयात लवकरच करण्यात येईल. त्याचबरोबर राधानगरी येथे १०० बेडचा हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून अंतिम मान्यतेसाठी प्रयत्न करण्यात येईल. दाजीपूर येथे पर्यटन प्राधिकरणासाठी साधारणत: ८४ गावांतील व्यापारी व नागरिकांच्या सूचना व मते जाणून घेवून याबाबतचा संबंधित विभागांनी आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. १५ व्या व १६ व्या वित्त आयोगातील कामे ज्या उद्देशासाठी नियोजित केली जातात त्याकामांसाठीच निधी खर्च करावा, अनावश्यक खर्च टाळावा, सोलार पंप, नेट मिटर, वीज या संबंधित तक्रारी विद्युत विभागाने मार्गी लावाव्यात. त्याचबरोबर विद्युत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. सर्व विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.