गणेश मोबाईल शॉपीतील चोरीचा छडा; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
जुने मोबाईल हॅन्डसेट, मदर बोर्ड व डिस्प्ले जप्त; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि.२८: जवाहरनगर येथील गणेश मोबाईल शॉपीमधून चोरीस गेलेले जुने मोबाईल हॅन्डसेट, मदर बोर्ड व मोबाईल डिस्प्ले असा एकूण ४० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी शिवम गणेश बडे (वय २४, रा. यशवंत कॉलनी, दत्तमंदिरजवळ, इचलकरंजी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत सचिन प्रताप जगदाळे (वय ४२, रा. राधा कन्हैया प्रोसेस, लक्ष्मी माळ, कोरोची, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली होती. गणपती कट्टा, जवाहरनगर येथील गणेश मोबाईल शॉपीमधून दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल हॅन्डसेट, मदर बोर्ड व मोबाईल डिस्प्ले दि. २३ जुलै रोजी रात्री ९ ते २४ जुलै रोजी सकाळी ९ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६२२/२०२६, बीएनएस कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सद्दाम सनदी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निळ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक इसम लिगाडे मळा येथील तिवारी गॅस एजन्सीजवळील रस्त्यावर, जवाहरनगर येथे चोरीचे जुने मोबाईल हॅन्डसेट व मदर बोर्ड विक्रीसाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. बातमीतील वर्णनानुसार एक इसम प्लास्टिकच्या पिशवीत काही वस्तू घेऊन येताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये जुने मोबाईल हॅन्डसेट व मदर बोर्ड आढळून आले. चौकशीत त्याने सदर मोबाईल हॅन्डसेट व मदर बोर्ड जवाहरनगर येथील गणेश मोबाईल शॉपीमधून सुमारे दोन महिन्यांपूर्वी चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक साने, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी, विकास चौगुले, प्रमोद चव्हाण व गणेश सनदी यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.