माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महापालिकेत कार्यशाळा

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 

दि.२८: नागरिकांना माहितीचा अधिकार अधिक प्रभावीपणे मिळावा, तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महापालिका सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार माहिती अधिकाराबाबत नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने महापालिकेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांनी मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील पारदर्शकता वाढविणारा महत्त्वाचा दुवा असून, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करून विहित कालावधीत आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींची योग्य माहिती ठेवावी, अभिलेखांचे व्यवस्थित जतन व व्यवस्थापन करावे आणि नागरिकांना आवश्यक माहिती सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेस सहायक संचालक नगररचना विजय फुलपगारे, सहायक आयुक्त रामचंद्र कांबळे, सहायक नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील, भांडार अधीक्षक गणेश शिंदे, उद्यान पर्यवेक्षक प्रशांत आरगे, संगणक विभाग प्रमुख अजय जाधव यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, जनमाहिती अधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माहिती अधिकार कायद्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करून नागरिकाभिमुख, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाला बळकटी देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.