दि लक्ष्मी को.ऑप. प्रोसेसर्स सलग ९ वर्षे नफ्यामध्ये!
आव्हानात्मक काळातही संस्थेची यशस्वी घोडदौड; ४३.७२ लाखांचा निवळ नफा
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि २८: आव्हानात्मक काळातील कठीण परिस्थितीला समर्थपणे सामोरे जात, सलग ९ वर्षे संस्था सतत नफ्यात ठेवण्याची अभिमानास्पद कामगिरी ‘दि लक्ष्मी को.ऑप. प्रोसेसर्स लि.’ ने केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५-२०२६ व्यवसायाच्या बाबतीत संमिश्र स्वरूपाचे गेले असले, तरी सर्व तरतुदी वजा जाता संस्थेस यंदा ४३.७२ लाख रुपयांचा घसघशीत निवळ नफा झाला आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय संचालक मंडळ, सभासद आणि निष्ठावान सेवक वर्ग यांना जाते, असे गौरवोद्गार संस्थेचे चेरमन मुकुंद फाटक यांनी काढले.

दि लक्ष्मी को.ऑप. प्रोसेसर्स लि., इचलकरंजी या संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील तांबे माळ परिसरातील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात पार पडली. यावेळी चेरमन मुकुंद फाटक यांनी सविस्तरपणे संस्थेच्या प्रगतीचा व आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. सभेच्या प्रास्ताविकात व्हा. चेअरमन राजाराम लोकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “लक्ष्मी प्रोसेसर्सने केवळ औद्योगिक व व्यावसायिक विस्तार न साधता नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान जपले आहे. कामगारांच्या जीवनाला योग्य गती दिली असून, संकटसमयी किंवा अडीअडचणीत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना संस्था नेहमीच वेळोवेळी मदत करत असते.” यावेळी डी.एम. बिरदार आणि गजाननराव सुलतानपुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक कला हा वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर करण्यात आला. या सुंदर व आकर्षक देखाव्याची निर्मिती केल्याबद्दल शिल्पकार/कलाकार नंदकुमार कौंदाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वार्षिक सभेस संस्थेचे संचालक मंडळ, मॅनेजर, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संचालक उमेश कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार संचालक सतीश बुरसे यांनी मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.