गायकवाडवाडीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह आढळला

संगमेश्वर वन विभागाकडून घटनास्थळीच अग्निसंस्कार; नैसर्गिक मृत्यूचा प्राथमिक अंदाज

संगमेश्वर : सचिन पाटोळे 

दि.३०: मौजे पांचाबे गायकवाडवाडी (ता. संगमेश्वर) येथे रस्त्याच्या बाजूला एका नर बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) आढळून आला. कुंचाबे येथील नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांनी याबाबत वन विभागाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली.माहिती मिळताच संगमेश्वर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू सुमारे नऊ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा. त्यामुळे मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

        कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तपासणीनंतर वन विभागाच्या नियमानुसार घटनास्थळीच लाकडाची चिता रचून बिबट्याच्या कुजलेल्या अवयवांवर अग्निसंस्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व अवशेष पूर्णपणे नष्ट करण्यात आले.

         ही कारवाई रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी संगमेश्वर-देवरुखचे वनपाल सागर गोसावी, आरवलीचे वनरक्षक सूरज तेली, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे, फुणगुसचे वनरक्षक आकाश कडूकर, कुटगिरीचे पोलिस पाटील तसेच प्राणीमित्र प्रणित टाकळे आणि शंकर जागुष्टे उपस्थित होते.

           दरम्यान, परिसरात वन्यप्राणी संकटात किंवा अडचणीत सापडल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी स्वतःहून कोणतीही कारवाई न करता तातडीने वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संगमेश्वर-देवरुख परिमंडळाचे वनपाल सागर गोसावी यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.