पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही
केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशनने घेतला पुढाकार
इचलकरंजी: विजय मेकोटे
दि १० मे :उपचारासाठी शासकीय मदतीचा लाभ न मिळणार्या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यासह अत्यल्प दरात उपचार देण्याचा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माणुसकी फौंडेशन यांनी घेतलेला निर्णय निश्चितपणे कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे पैसे नाहीत म्हणून कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जोपासणार्या माणुसकी फौंडेशन आणि सेवावृत्तीने वैद्यकिय क्षेत्रात सेवारत असलेल्या केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने कोणीही गोरगरीब, सर्वसामान्य रुग्ण वैद्यकिय उपचारापासून वंचित राहू नये यासाठी लहान मुलांवर मोफत उपचार, खर्चिक उपचारांसाठी बिनव्याजी कर्ज, मोफत शस्त्रक्रिया आदी उपचार सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या सेवेच्या माहितीपत्रकाचा शुभारंभ पोलिस उपअधिक्षक श्री. महामुनी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
श्री. महामुनी यांनी, कोरोना महामारीच्या संकटाने माणूस आपल्याच माणसांपासून दूरावल गेला असला तरी अवघ्या जगाला सेवाभावी कार्याकडेही वळविले. पहिल्या टप्प्यात कोरोनाची मोठी भिती होती. पण त्या काळात कोरोची येथील केअर मलिस्पेशालिटी हॉस्पिटल व माणुसकी फौंडेशन यांनी कोणताही विचार न करता केवळ सेवारत होण्याचा निर्णय घेतला. केअर हॉस्पिटलने या संकटकाळात कोरानासह आवश्यक सर्व उपचारांसह मोफत शस्त्रक्रियाही केल्या. तर संपूर्ण औद्योगिक क्षेत्रच ठप्प झाल्याने निराधार गोरगरीबांना दोन वेळचे अन्न त्यांच्यापर्यंत पोहचवून माणुसकी फौंडेशनने माणुसकी जोपासली. या दोघांचेही त्यांच्या क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून त्यांचा आदर्श इतरांनीही निश्चितपणे घ्यावा, असे आवाहन केले.
स्वागत माणुसकी फौंडेशनचे सदस्य प्रथमेश इंदुलकर यांनी केले. माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवि जावळे यांनी, आम्ही अनेक रुग्णांना शासकीय रुग्णालयात घेऊन जातो. मात्र हातकणंगले तालुक्यातील शासकीय रुग्णालयात योग्य व आवश्यक त्या उपचाराच्या सुविधा उपलब्ध नाहीत. म्हणूनच केअर हॉस्पिटल ने माणुसकी फौंडेशन ला सोबत घेऊन अत्यल्प दरात उपचार तसेच खर्चिक उपचारासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलसोबत आम्ही आणखीन चांगले काम करून उपचाराविना कोणीच राहणार नाही यावर लक्ष केंद्रीत करु असे सांगितले.
योजनासंबंधी माहिती देताना केअर हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पाटील यांनी, पैशाअभावी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येणे अशक्य असल्याने अनेक रुग्णांनी उपचाराविना प्राण गमावले आहे. मात्र आता पैसे नाहीत म्हणून कोणीही उपचाराविना राहणार नाही आणि कोणालाही प्राण गमवावा लागणार नाही असा संकल्प माणुसकी फौंडेशन व केअर हॉस्पिटल यांनी केला आहे. त्यामध्ये 1 ते 15 वर्षापर्यंतच्या सर्वच लहान मुलांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. त्या विविध चाचण्या, तपासण्या, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या नाममात्र दरात केल्या जाणार आहेत. तर ज्या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही अशा रुग्णांना उपचार खर्चासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले. याप्रसंगी विविध मान्यवर, हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ, माणुसकी फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.