डी.के.टी.ई. च्या प्रा. दिपाली ढंग यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी :विजय मकोटे
दि ३० जुलै इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका दीपाली ढंग यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व्दारे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळाली. ‘ऍनालिसिस ऑफ ऍकॉस्टिक फीचर्स ऑफ सिगिंग व्हॉइस फॉर सिंगर आयडेंटीफिकेशन’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डॉ. शैला सुब्बरामन, माजी डीन अॅकॅडमिक्स, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली यांचे मार्गदर्शन मिळाले.
गाण्याच्या कोणत्याही ओळीतून मूळ गायकाची ओळख पटवणे आणि ते मूळ गायकाने गायले आहे की अन्य गायकाने गायले आहे याची पडताळणी करणे हे त्यांचे संशोधन कार्य होते.हया संशोधनाबरोबरच, त्यांनी मंगेशकर बहिणी व किशोर कुमार – अमित कुमार पिता पुत्र यांच्या अनुवांशिक आवाजातील अनुवंशीक सारखेपणा यावरही संशोधन केले आहे. या संशोधनाव्दारे नाते संबंधातील आवाजाच्या सारखेपणा विषयी अधिक प्रगत संशोधन करण्यासाठी पायाभूत माहिती मिळवून दिली आहे. तसेच त्यांनी गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या ६२ वर्षाच्या कार्यकीर्तीतील ३५० गाण्यांचा अभ्यास करुन, त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आवाजामध्ये झालेल्या फरकांवर संशोधन केले आहे. लता दीदींनी वर्षानुवर्षे आपला आवाज उत्तम राखण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे, त्यांचा आवाज दीर्घ काळ श्रवणीय होता हे या संशोधनाव्दारे स्टॅटिस्टिकल दृष्टया सिध्द केला आहे.
दीपाली ढंग यांनी नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये चार शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि पाच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे कार्य सादर केले आहे. संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, व डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे यांनी तिचे कौतुक केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.