ब्राह्मण सभा इचलकरंजी यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
इचलकरंजी – संजय आंबे
दि. ३ ऑगस्ट :भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही. आज देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने समाजातील सामाजिक कार्याबद्दल लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरव अन् सन्मान केला जातो. हा एक स्त्युत्य उपक्रम असून ब्राह्मण सभेने भविष्यात युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरु करावे. त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन विटा मर्चंटस् को-ऑप. बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांनी केले.
ब्राह्मण सभा इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन श्री. गुळवणी बोलत होते. यावेळी अधिपती श्रीमंत यशवंतराव घोरपडे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोल्हापूर जिल्हा सरकारी वकिल अॅड. विवेक शुक्ल यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वयंसेवक दत्तात्रय व्यंकटेश जोशी यांना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ आणि गणेशप्रसाद जयराम भांबे (औद्योगिक), डॉ. अमित विलास जोशी (वैद्यकिय), सौ. विद्या भास्कर फडके (केटरींग), डॉ. सौ. सुजाता सदानंद कुलकर्णी (वैद्यकिय) यांना ’श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी अॅड. विवेक शुक्ल यांनी, पैसा, धन यांच्या श्रीमंतीपेक्षा ज्ञान-बुध्दीची श्रीमंती मोठी असते. होणार्या टीकांकडे दुर्लक्ष करुन भविष्यातील आव्हानांचा विचार करावा. समाजसेवेची पोच पावती मिळणे हे समाधान मोठे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात वेदमुर्ती प्रभाकर भाटवडेकर व सहकार्यांच्या वेदमंत्र पठणाने झाली. तसेच भगवान परशुराम, लोकमान्य टिळक, समर्थ रामदास, श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत ब्राह्मण सभा अध्यक्ष सुरेश जोशी व समर्थ संस्थेचे चेअरमन अॅड. मोरेश्वर सहस्त्रबुध्दे यांनी केले. प्रास्ताविकात विश्वस्त हेमंत कुलकर्णी यांनी आजवरच्या कार्याचा आढावा घेत पुढील योजनांचा माहिती दिली. मानपत्राचे वाचन अरविंद कुलकर्र्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. पद्मनाभ कुलकर्णी यांनी करुन दिला.
कार्यक्रमास ब्राह्मण सभेचे विश्वस्त मुकूंद फाटक, दिगंबर कुलकर्णी, जयंत फडके, संजय मैंदर्गी, संदीप जोशी, मंदार जोशी, सतिश पळसुले, चेतन उत्तुरकर आदींसह मान्यवर व ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी ब्राह्मण सभेचे विश्वस्त शैलेश गोरे व संचालक श्रीपाद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.