इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि १ जानेवारी :येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर व्हिजन इचलकरंजी, यंत्रमाग तयार करण्यात स्वत:च ब्रॅण्ड निर्माण करणारे पंडीत सुतार, क्रीडा क्षेत्रात वस्त्रनगरीचे नांव उंचावणारे अजिंक्य रेडेकर, वस्त्रोद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे पांडुरंग धोंडपुडे आणि शैक्षणिक क्षेत्रात लौकिक असलेले विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी यांचा समावेश आहे. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज जाधव यांनी संघटनेच्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा केली.
पत्रकार दिनी शुक्रवार 6 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता रोटरी क्लब सभागृह दाते मळा येथे हा पुस्कार समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची उपस्थित राहणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज जाधव, उपाध्यक्ष शितल पाटील, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष सत्यनारायण धुत यांनी केले आहे.
इचलकरंजी शहरातील विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सदैव अग्रभागी असणार्‍या त्याचबरोबर नेहमी सामाजिक उपक्रम राबविणार्‍या ‘व्हिजन इचलकरंजी’ या सामाजिक संघटनेची ‘सामाजिक‘ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशभरात पंडीत सुतार लूम असा ब्रॅण्ड निर्माण करुन वस्त्रनगरीच्या वस्त्रोद्योगाला आयाम देणारे पंडीत दादोबा सुतार यांना ‘उद्योजक’, शिवछत्रपती पुरस्कारासह भारत श्री चा किताब मिळवत शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात इचलकरंजीची मान उंचावणार्‍या अजिंक्य रेडेकर यांना ‘क्रीडा’, वस्त्रोद्योग क्षेत्रात आपला ठसा निर्माण करणार्‍या पांडुरंग धोंडपुडे यांना ‘वस्त्रोद्योग’ आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करुन देणार्‍या विकास मंदिर व चौगुले बालवाडी यांना ‘शैक्षणिक’ पुरस्कार देण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.