शहिद जवानांच्या वारसांना जमीन उपब्धतेबाबत प्रस्ताव सादर करा

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली :प्रतिनिधी  

दि. 2  : शहिद जवानांच्या विधवा पत्नीस आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना जमीन देण्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थींना जमीन उपलब्धतेबाबत तहसिलदार आणि सैनिक कल्याण मंडळाच्या टीमने जमिनीची पाहणी करून याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

            जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस तहसिलदार अनंत गुरव,  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) व कल्याण मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार बैठकीस दूरदृष्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

        बैठकीत पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक / माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण (तक्रारी व गाऱ्हाणे सोडविण्यासाठी) समिती गठन करणे, ध्वजदिन निधी संकलन, सी.एस.डी. कॅन्टीन सैनिक संकुल आवारात स्थलांतरीत करणे, सैनिक दरबाराचे आयोजन, शहिद जवानांच्या वारसांना निवासी प्रयोजनासाठी जमीन वाटप, सैनिक संकुल परिसर सुशोभिकरण आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.

            सैनिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रशासन प्राधान्य देईल. शेतजमीन रस्ते, वारस नोंद ही कामे प्राधान्याने सोडविली जातील. माजी सैनिकांकडून त्यांच्या कामांचे प्रस्ताव परिपूर्ण सादर व्हावेत यासाठी सैनिक कल्याण विभागाने मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.