डीकेटीईमध्ये ‘आमचे दादा‘ हा कल्लाप्पाण्णा आवाडे दादांसाठी ॠणनिर्देशपर कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २२: डीकेटीई परिवारातर्फे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादांच्या अतुलनिय योगदानाबददल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘आमचे दादा‘ हा एक कौटुंबिक कार्यक्रम डीकेटीईच्या प्रांगणात मोठया उत्साहात संपन्न झाला. आदरणीय आवाडे दादांच्या कार्याचे स्मरण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनशैलीचा उत्सव सर्वजण मिळून साजरा करण्यासाठी डीकेटीईच्या कर्मचा-यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा दीपप्रज्वलन सोहळा संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळेस संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचेसह आवाडे कुंटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य, डीकेटीईचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेच्या प्र. संचालिका डॉ. एल.एस. आडमुठे यांनी केले. त्यांनतर डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्याद्वारे दादांचे व्यक्तीमत्व खुलवणारी गीते सादर करण्यात आली. यावेळी शाहीर संजय जाधव यांनी सादर केलेल्या दादांच्या जीवनावरील स्वरचित पोवाडयाने उपस्थित सर्व श्रोत्यांची मने जिंकली.
संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांनी भावविश्वातील दादा या विषयावर दांदाचे अवघे जीवनचरित्रच जणू नेत्रपटलासमोर अलगद उलगडले. यामुळे कार्यक्रमात खरी रंगत आली व कार्यक्रमाने वेगळीच उंची गाठली. या भाषणामधून दादांची दुरदृष्टी, सृजनशिलता, सकारात्मक दृष्टीकोन, त्यांची शिक्षणाबदलची असीम आवड अशा व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंना उजाळा मिळाला.
यानंतर कार्यक्रमामध्ये दादांची शिक्षणाबददलची नितांत श्रध्दा लक्षात घेवून पुस्तक तुला करण्यात आली. यामध्ये डीकेटीईच्या सर्व शाखांकडून व दादांच्या स्नेहींकडून पुस्तके भेट स्वरूपात मिळाली होती ती सर्व पुस्तके लायब्ररीराला भेट स्वरुपात देण्यात आली या पुस्तकांमध्ये स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असणारी पुस्तके, एंटरन्स एक्झाम साठी उपयुक्त असणारी सर्व पुस्तके, तसेच विविध धार्मिक ग्रंथासहित अनेक शैक्षणिक पुस्तकांचा समावेश होता. पुस्तकतुलेला सर्वांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सोशल डीन प्रा. सचिन कानिटकर यांनी केले. या कार्यक्रमात संपूर्ण आवाडे परिवार, दादांचे स्नेही, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सह.साखर कारखान्याचे पदाधिकारी, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे पदाधिकारी, विविध स्पिनिंग मिलचे पदाधिकारी, विविध बँका, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था – संघटनेचे पदाधिकारी, दादांवर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, नागरिक व डीकेटीईचा सर्व स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होता. या सर्वांनी व्यासपीठावर येवून दादांना शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला.
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांची पुस्तक तुला प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे,उपस्थित सर्व आवाडे कुटुंबीय व इतर मान्यवर.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.