रोटरीतर्फे युवा गौरव सोहळा संपन्न
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. १ जून : आंतरराष्ट्रीय रोटरीच्या वतीने संपूर्ण जगभरात मे महिना हा ‘युवा महिना’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी टेक्सटाईल सिटी, रोटरी एक्झिक्युटिव्ह आणि रोटरी क्लब अतिग्रे यांच्या वतीने शहर व परिसरातील निवडक आठ युवक युवतींचा समारंभपूर्वक गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. चेतन नरके, कोल्हापूर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भंडारे (नियुक्त प्रांतपाल प्रांत ३१७०) यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना गौरविण्यात आले. याप्रसंगी बोलताना नरके यांनी “कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी खूप कष्ट आवश्यक असतात. यशाला शॉर्टकट नसतो. यश मिळवण्यासाठी आपल्या कामाप्रती निष्ठा, ध्येय आणि सातत्याने प्रयत्न आवश्यक असतात. आजच्या पिढीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपला उद्योग व्यवसाय अथवा इतर क्षेत्रात प्रगती करीत असताना आपल्या सोबतच्या समाजातील कमकुवत घटकांनाही आधार दिला पाहिजे” अशा आशयाचे प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बोलताना भंडारे यांनी “देश समृद्ध होण्यासाठी देशातील युवावर्ग हा महत्त्वाचा घटक आहे. आपला युवावर्ग हा अनेक समस्यांवरील उपाय आहे. आजच्या युगात अनेक क्षेत्रात मुलींनीही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे हे कौतुकास्पद आहे” अशा आशयाचे उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक प्रांतपाल सीए श्रीकिसन भुतडा आणि रवि अडुकिया हे उपस्थित होते.
कार्यक्रमात नरके आणि भंडारे यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि बुके प्रदान करून सागर दीपकराज पोतदार (खो खो), रोहित राजेंद्र शहा (उद्योग), पूर्वा सुनील शेवाळे (मॅरेथॉन), राशी अमृतलाल पारख (शैक्षणिक), विनायक अशोक माळी (सामाजिक), अभिजीत बाबासाहेब चौगुले (व्यावसायिक), अमन मुजीब कुट्टी (शरीर सौष्ठव) आणि चैत्राली अतुल उत्तुरकर (शास्त्रीय नृत्य) यांचा, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी सर्व गौरव मूर्तीनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष नितीनकुमार कस्तुरे यांनी बुके प्रदान करून पाहुण्यांचे स्वागत केले तर सेक्रेटरी सुरेश चौगुले यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. फोर वे टेस्टचे वाचन अतिग्रे क्लबचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी केले. यावेळी एक्झिक्युटिव्ह क्लबचे सेक्रेटरी शितल उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय माजी अध्यक्ष नागनाथ बसुदे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटीचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अतिग्रे क्लबचे सेक्रेटरी सचिन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. अमर कांबळे आणि सौ. सायली बंब यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या कार्यक्रमास रोटरी परिवारातील सदस्य त्याचबरोबर निमंत्रित आणि सत्कारमूर्तींच्या परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.