प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होणाऱ्यांचा आदर्श घ्यावा – ॲड स्वानंद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२७ :नोबेल पुरस्कार प्राप्त मारी क्युरी, मलाला युसुफजई, आंग संग सू की, सुधा मूर्ती इ. मुलींची व महिलांची उदाहरणे देत, “प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता, त्या परिस्थितीचा संधी सारखा वापर करीत धैर्याने आपले ध्येय गाठले पाहिजे. कार्यकर्तृत्त्वाने मोठे होणे म्हणजे आपल्या पालकांना, शाळेला पुरस्कृत करण्यासारखेच असते. भविष्यात ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात संधी निर्माण करा व शाळेला पुरस्कार द्या.” असे प्रतिपादन ॲड. स्वानंद कुलकर्णी यांनी केले. श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित 57 व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲड. श्री स्वानंद कुलकर्णी व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.संगीत शिक्षिका व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले तसेच कु.अवनी फडके इ. 7 वी अ हिने आपले बासरी वादन सादर केले. “व्यक्तीच्या सतत सोबत राहणारी शक्ती म्हणजे शिक्षण. त्यासाठी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व शिक्षणासाठी आमची शाळा सातत्याने कार्यरत होती व राहील. संस्था, शाळा, विद्यार्थिनी व पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थिनींची शैक्षणिक, बौद्धिक, कला, व क्रीडा या क्षेत्रात शाळेची प्रगती कायम राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.” असे विचार स्वागत व प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी मांडले.
‘कवी मनाचा वकील’ आणि सिद्धहस्त लेखक असे अनोखे व्यक्तिमत्त्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे अशा शब्दांत प्रशालेचे पर्यवेक्षक श्री एस .एस .कोळी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. स्नेहा बसुदे हिने क्रीडा अहवाल सादर केला. यावेळी राज्य व राष्ट्रीय स्तरावर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, योगासन इ. खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या तसेच 57 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, वह्या, ट्रॉफीज व शील्ड इ. देऊन गौरव करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा म्हणाले, “वार्षिक पारितोषिक समारंभ म्हणजे चैतन्य व उत्साह यांनी भारलेला दिवस असतो. विद्यार्थिनींनी जिद्द ,चिकाटी, खडतर प्रयत्न यांच्या बळावर गंगामाईची खेळाची उज्ज्वल परंपरा जपली आहे. विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या व खेळाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधली पाहिजे. त्यासाठी शाळा व संस्था नेहमी तुमच्या पाठीशी राहील.असे आश्वासन देत कृष्णाजी बोहरा यांनी प्रशालेच्या राष्ट्रीय पासून जिल्हा पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
याप्ररंगी संस्थेचे विश्वस्त श्री अहमद मुजावर, श्री सुरेंद्रकुमार बांगड, मुख्याध्यापिका सौ. ए. एस .काजी, उपप्राचार्य श्री व्ही. जी. पंतोजी, उपमुख्याध्यापक श्री. व्ही. एन कांबळे, पर्यवेक्षक श्री .एस. व्ही. पाटील व श्री. एस. एस. कोळी, क्रीडाप्रमुख श्री डॉ. श्री राहुल कुलकर्णी, क्रीडाशिक्षक श्री के. ए. पाटील, सौ. व्ही. के. पाटील, सौ. सोनल बाबर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य श्री व्ही. जी पंतोजी यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.