इचलकरंजीत विकास पर्व सभेची जय्यत तयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इचलकरंजीत

इचलकरंजी: विजय  धुत्रे 
दि .२३ : येथील विविध योजनेतील विकासकामांचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवार २३ मे रोजी इचलकरंजीत येत आहेत. यानिमित्ताने केएटीपी मैदानावर होणार्‍या विकास पर्व सभेची जय्यत तयारी सुरु असून आमदार राहुल आवाडे हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून २३ मे रोजी सहा महिने होत आहेत. आणि अल्पावधीतच मुख्यमंत्र्याच्या इचलकरंजी दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सातशे कोटीहुन अधिक खर्चाच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनातील कामांचा ऑनलाईन शुभारंभ, उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शहापुर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन होणार असून त्यानंतर केएटीपी मैदानावर भाजपची विकास पर्व जाहीर सभा होणार आहे. या सभेस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थित असणार आहे.
या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून आमदार राहुल आवाडे हे स्वत:  जातीने लक्ष देत आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी मोठा डोम उभारण्यात आला असून बैठक व्यवस्थेसाठी २० हजार खुर्च्या मांडल्या आहेत. पोलिसांनीही मुख्यमंत्री येणार्‍या मार्गावरुन आज संचलन केले. मेळाव्याच्या ठिकाणीही सुमारे २५० पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा बंदोबस्त असणार आहे. या पूर्व तयारीची आणि सभास्थळाची जिल्हा पोलीस प्रमुख यांनी पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधिक्षक समिरसिंह साळवे, निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.