एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती सदस्य संख्या असावी : अविनाश कांबळे

इचलकरंजी: विजय धुत्रे 
दि .१२ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीत एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणातच अनुसुचित जाती (एस.सी.) साठी प्रतिनिधीत्व देण्यात यावे, अशी मागणी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे अध्यक्ष अविनाश गुलचंद कांबळे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे. ६५  सदस्य संख्येच्या प्रमाणात अनुसुचित जातीसाठी प्रतिनिधीत्व दिल्यास आणखीन २  ते ३  जागा मिळतील, असे कांबळे यांनी म्हटले आहे.
     निवेदनात, इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना निश्‍चित केली असून एकूण १६  प्रभागात ६५  सदस्य असणार आहेत. मात्र त्यामध्ये अनुसुचित जातीसाठीची सदस्य संख्या ही सन २०१६  च्या इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणूकीप्रमाणे निश्‍चित धरण्याचे प्रयोजन दिसत आहे. सन २०११  च्या जनगणना लोकसंख्येनुसार त्यावेळी तत्कालीन नगरपालिकेत सदस्य संख्या ही ५७ होती. तर अनुसुचित जातीचे ५  सदस्य होते. त्यानंतर सन २०१६ च्या निवडणूकीत एकूण सदस्य संख्या ६१  झाली तर अनुसुचित जाती सदस्य संख्या ६ झाली होती. तर सध्या इचलकरंजी शहराची लोकसंख्या ही ३  लाखापेक्षा अधिक गृहीत धरुन इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले. त्या अनुषंगाने सन२०२५-२६ च्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण सदस्य संख्या ६५  अशी निर्धारीत केली आहे. मात्र अनुसुचित जाती सदस्य संख्या सन २०१६  नुसार ६  सदस्य कायम करण्याचे प्रयोजन दिसत आहे. तसे झाल्यास अनुसुचित जातीवर अन्याय होणार आहे. त्यामुळे अनुसुचित जातीची लोकसंख्या गृहीत धरुन एकूण सदस्य संख्या ६५  चे प्रमाणात अनुसुचित जातीसाठीच्या सदस्य संख्येत वाढ करुन जागा आरक्षित करत अनुसुचित जाती समाजाला न्याय मिळावा, असे अविनाश कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
        त्याचबरोबर अविनाश कांबळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील सदस्य संख्येची आकडेवारीसह माहिती सादर केली असून नेमक्या कोणत्या आधारावर महानगरपालिका प्रशासनाने लोकसंख्या, सदस्य संख्या व अनुसुचित जाती सदस्य संख्या निश्‍चित केली या संदर्भात माहितीच्या अधिकारान्वये माहिती मागितली असून अनुसुचित जाती सदस्य संख्या योग्य प्रमाणात न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.