स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान

जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यन पटेल 

दि. १७,  : सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या SPARSH (SYSTEM FOR PENSION ADMINISTATION RAKSHA) प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.रक्षा लेखा नियंत्रक दक्षिण कमान पुणे आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय स्पर्श प्रणाली पेन्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा सैनिक संकुल येथे आयोजित या पेन्शन मेळाव्यास यावेळी रक्षा लेखा विभाग PCDA(SC) पुणेच्या उपनियंत्रक स्वाती सुर्वे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त), विंग कमांडर प्रकाश नवले, शौर्य चक्र,  ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवाडकर, माजी कॅप्टन सुनील गोडबोले, कॅप्टन (IN) संजय जाधव आदि उपस्थित होते.

स्पर्श प्रणालीचे महत्व, उपयुक्तता आणि पारदर्शकता याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्पर्श प्रणाली पेन्शन धारकांना फक्त सुविधाच देत नाही तर वेळेवर सेवाही प्रदान करते. या मोहिमे अंतर्गत पेन्शन धारकांमध्ये जागरुकता निर्माण करावी, असे ते म्हणाले.

यावेळी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी स्पर्श प्रणालीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते दहा वरिष्ठ रक्षा पेन्शनर यांना सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते अमर जवान स्मारकास पुष्प चक्र अर्पण करण्यात आले. द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात आली. प्रास्ताविक श्रीमती स्वाती सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन नेहा सोनेवाल यांनी केले.

कार्यक्रमस्थळी पेन्शन धारकांना मदत करण्यासाठी विविध सुविधा टेबल उपलब्ध करून दिलेले होते. ज्यात स्वागत नोंदणी, हेल्प डेस्क, डिजीटल जीवन प्रमाणपत्र, पीएसआर (PROFILE SERVICE REQUEST), फेस ऑथेंटिकेशन काऊंटर आदिंचा समावेश होता.

कार्यक्रमास अजय चंदोरे, जयंत पोतदार, अशोक कुमार लाल दास यांच्यासह अन्य सहाय्यक लेखाधिकारी, लेखा परीक्षक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक तथा माजी सैनिकांच्या पत्नी व अवलंबीत आदि उपस्थित होते. या मेळाव्यांतर्गत 18 नोव्हेंबर 2025 रोजीही सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हा सैनिक संकुल, सांगली येथे कामकाज केले जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.