जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

सांगली: अय्यान पटेल

दि.२६:जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न” अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. निमित्त होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तृतीयपंथीय उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे.

       दररोज सामाजिक गैरसमज, उपेक्षा आणि टाळाटाळीचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीय बांधवांसाठी हा मेळावा आत्मविश्वास देणारा आणि नव्या सुरुवातीचा टप्पा ठरला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. यावेळी सहायक आयुक्त (समाजकल्याण) बाळासाहेब कामत, जिल्हा उद्योग अधिकारी ता. ना. खांडेकर, सहायक आयुक्त इनुजा शेख, यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, कौशल्य विकास सहायक अमोल बोळाज तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आरती पै, शांतिलाल काळे, किरण देशमुख, राजेंद्र (सुधा) पाटील, इम्तियाज हकीम आदी मान्यवर उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सामाजिक गैरसमजांना बळी न पडता स्वावलंबनाच्या दिशेने ठामपणे पाऊल टाका. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करा.” त्यांच्या या प्रेरणादायी संदेशामुळे उपस्थित उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाची नवी ज्योत प्रज्वलित झाली.सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रास्ताविकात शासन विविध योजनांद्वारे तृतीयपंथीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा त्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       मेळाव्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या योजनांची माहिती इनुजा शेख यांनी दिली. उद्योग विभागाच्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन जिल्हा उद्योग अधिकारी ता. ना. खांडेकर यांनी केले. National Career Service (NCS) पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेची माहिती प्रवीण बनकर यांनी दिली, तर अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांबाबत अमोल बोळाज यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार वैयक्तिक सल्ला देण्यात आला. विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, ऑनलाईन नोंदणी, कर्ज प्रस्ताव सादरीकरण तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही सविस्तरपणे समजावून सांगण्यात आली.

       समाजाच्या कडेला उभ्या असलेल्या तृतीयपंथीय बांधवांना शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील संवेदनशील हेतू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. केवळ नोकरी उपलब्ध करून देणे नव्हे, तर आत्मविश्वास जागवून स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे, हेच या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले.या विशेष मार्गदर्शन मेळाव्यास जिल्ह्यातील तृतीयपंथीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले. तृतीयपंथीयांसाठी कार्यरत संग्राम, व्हीएएमपी, मुस्कान व सीवायडीए या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही कार्यक्रमास उपस्थित होते.

       “सांगली पॅटर्न” म्हणजे केवळ आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना नसून सामाजिक समावेशकतेचे जिवंत उदाहरण आहे, याची जाणीव या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली. मानवतेचा हात धरून समानतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.