नगरसेवक व प्रशासनाच्या समन्वयातूनच शहराचा विकास — चंद्रकांत इंदलकर

महाबळेश्वर: कुणाल शाह 

दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी झाली असून पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यासच शहराचा सर्वांगीण विकास शक्य होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्राचे सदस्य तथा पुणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदुलकर यांनी केले.


इचलकरंजी महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महाबळेश्वर येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. शुक्रवारी झालेल्या या कार्यशाळेत इंदलकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना, कार्यपद्धती आणि शहरी तसेच ग्रामीण विकासातील भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या जबाबदाऱ्या, महानगरपालिका अधिनियमातील तरतुदी, स्थायी समित्या, आयुक्त व उपायुक्त यांची कर्तव्ये यांचा त्यांनी ऊहापोह केला.


याशिवाय अनधिकृत बांधकाम, नगरसेवक अपात्रता, सभांमधील उपस्थिती, स्वच्छता, वृक्षलागवड, अग्निशमन सेवा, रुग्णालय व्यवस्था, स्मशानभूमी, पाणीपुरवठा आणि उत्पन्न वाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या विषयांवरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात इचलकरंजी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी जीवन सोनवणे यांनी शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.      प्रशासन व पदाधिकारी एकमताने निर्णय घेतल्यास शहराचा विकास निश्चितच घडतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना नगरसेवकांना मिळणारे प्रशिक्षण इचलकरंजीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महापौर उदय धातुंडे यांनी इंदूरच्या धर्तीवर इचलकरंजी शहराचा विकास करण्याचे आवाहन करत स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.