माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा जिल्हा प्रशासनातर्फे हृद्य सत्कार

सांगली: अय्यान पटेल

दि. १५ :महाराष्ट्र राज्य कृषि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व सांगलीचे माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा आज जिल्हा प्रशासनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास श्री. काकडे यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, समाधान शेंडगे, नीता सावंत, विजया यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उत्कृष्ट टीमवर्कला श्रेय – अशोक काकडे

     ‘माझी सांगली, माझा अभिमान’ या संकल्पनेतून सांगलीतील कार्यकालात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे श्रेय महसूल विभागासह अन्य विभागांच्या उत्कृष्ट टीम वर्कला देत माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषि विभाग, शिक्षण विभाग अशा अनेक विभागांनी दिलेल्या सहकार्यामुळे चला शेतकऱ्यांना व्यापारी करूया, दिव्यांग सक्षमीकरण, घरेलु कामगार आरोग्य शिबिर, एचआयव्ही बाधितांचा वधूवर मेळावा, मुलींना कराटे प्रशिक्षण असे अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवता आले. महसूल विभागामार्फतही फेरफार निर्गती, पाणंद रस्ते खुले, भूसंपादन मोबदला अशी कामे करता आली. आपल्या कार्यकालात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ६५० शस्त्र परवाने रद्द केले, असे त्यांनी सांगितले.

     माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, समाज सर्वांचा मिळून होतो. त्यामुळे समाजाभिमुख काम करताना उदात्त ध्येय ठेवून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामकाज करावे, असा प्रेमळ सल्ला देऊन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, सांगलीतील कार्यकालात केलेल्या सर्व चांगल्या कामांचे श्रेय टीम वर्कला देऊन सांगलीच्या प्रशासनातील टीम प्रशिक्षित असल्याबद्दल गुणोद्‌गार काढले. आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात सांगलीने अनेक चांगले अनुभव दिले असून, सांगलीशी आपला कायम ऋणानुबंध राहील, असे भावनिक उद्‌गार त्यांनी यावेळी काढले.

 

लोकाभिमुख प्रशासनावर भर – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

    माजी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याप्रमाणेच लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर असेल, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी डॉ़. मैनाक घोष यांनी दिला. यावेळी श्री. काकडे यांनी केलेल्या विविध कामे यापुढेही सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसीलदार शामला खोत, अर्चना कापसे आणि योगेश टोंपे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, जतचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह मनोहर नांदे पाटील, आप्पासाहेब पाटील, नितीन चौगुले, श्रीकांत शिंदे, प्रविण शिंदे, युवराज शिंदे, रामचंद्र पवार, भाग्यश्री फाळके, राजकुमार पेडणेकर, रोहित नलावडे आदिनी मनोगतात श्री. काकडे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तहसीलदार लीना खरात यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.