कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
संगमेश्वर : नियाझ खान
दि .५ :कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका संगमेश्वर अंतर्गत ग्राम शाखा आंबव-पोंक्षे यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम शाखेचे अध्यक्ष कृष्णा सोमा धुलप होते. उद्घाटन सुरेशजी भायजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ शाखा संगमेश्वरचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
स्पर्धेच्या युगात सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करता येते, असा संदेश मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम शाखेचे सचिव दिपक सोमा शिगवण, अध्यक्ष कृष्णा सोमा धुलप तसेच कुणबी शाखा आंबव-पोंक्षेचे सर्व सभासद, हितचिंतक आणि देणगीदार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यामुळे समाजबांधवांमधील आपुलकी आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
कुणबी समाजोन्नती संघाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा हा उपक्रम आदर्शवत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.