बेडग येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा; प्रलंबित लाभ तात्काळ मिळवून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 सांगली: अय्यान पटेल

दि.२३: मिरज बालविकास प्रकल्प आणि बेडग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील बेडग येथे ‘एकल महिला दिवस’ अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. ज्या महिला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत, अशा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय विभागांनी योग्य समन्वय साधावा आणि तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिल्या.

     बेडग येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी उपस्थित एकल महिलांशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास सभापती स्नेहल मोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, बेडग चे सरपंच उमेश पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे – धुमाळ, जिल्हा महिला बालविकास अधिकारी वर्षा पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रज्योत महाजन आदी उपस्थित होते.      जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी एकल महिलांशी संवाद साधत महिलांच्या समस्या, अडीअडचणी अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेतल्या. सद्यस्थितीत किती एकल महिलांना शासकीय योजनांचे लाभ मिळाले आहेत, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. 

      यावेळी एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ‘महिला बचत गटां’मध्ये कसे सहभागी व्हावे, बँकांचे अर्थसाहाय्य आणि स्वतःचा रोजगार कसा सुरू करावा, याविषयी तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.प्रास्ताविकात बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रज्योत महाजन यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि हेतू स्पष्ट केला. एकल महिलांना समाजात मानाचे स्थान आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती घेऊन करण्यात आली.

       कार्यक्रमास बेडग ग्रामपंचायतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बेडग आणि परिसरातील एकल महिलांनी अत्यंत उत्स्फूर्त आणि विक्रमी संख्येने हजेरी लावली होती. बेडग ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.