डीकेटीई च्या तब्बल १११ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या कंपनीमध्ये भरघोस पॅकेजवरती निवड

इचलकरंजी: संजय आंबे

दि २५ नोव्हेंबरः डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरींग विभागामध्ये कॅपजेमिनी कंपनीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हयूव मध्ये संस्थेच्या सर्वाधिक तब्बल १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ ते ७.५ लाख इतके भरघोस पॅकेज देण्यात आले आहे.  सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्यांचा दबदबा आहे आणि इंजिनिअर क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याकारणाने हे यश मोठे मानले जाते आहे. एकशे अकरा विद्यार्थी एकाच कंपनीत निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्यात चैतन्याचे वातावरण आहे.  
कॅपजेमिनी ही फ्रान्स स्थित जागतिक मानांकीत सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी असून जगभरात अनेक देशामध्ये कंपनीचे कॉर्पोरेट ऑफीस आहेत. भारतामध्ये पुणे येथील कार्यरत असणा-या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईच्या १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  या कॅम्पस इंटरव्हयुकरीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या.  अ‍ॅप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर राउंड या सर्व फे-यांमध्ये डीकेटीई च्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिध्द केली.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागातून- ५०, मेकॅनिकल विभागातून-१८, इलेक्ट्रॉनिक्स विभागातून-२१, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागातून-११, इलेक्ट्रीकल विभागातून-०८, सिव्हील विभागातून-०३ असे एकूण १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. संस्थेमध्ये इंटरव्हयुच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात.  तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते त्यामुळेच या तयारीचा खूप उपयोग झाला. या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, सचिव डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर विद्यार्थ्यांस संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले,उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ.डी.व्ही.कोदवडे, डॉ व्ही.आर.नाईक, डॉ.एस.ए.पाटील व सर्व विभागप्रमुख,सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये कॅम्पस इंटरव्हयूव मधून निवड झालेले तब्बल १११ विद्यार्थी.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.