इचलकरंजी पंचगंगेतील गाळ काढण्याच्या कामाला मिळणार गती
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१२: येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या अतिरिक्त गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मागणीवरुन ही बैठक झाली. त्यामध्ये अतिरिक्त गाळ काढण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय झाला.
पंचगंगा नदीपात्रातील गाळामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होत असून पावसाळ्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नदीपात्रातील अतिरिक्त गाळ काढून पाणीवहन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गाळ काढण्याच्या कामामुळे नदीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्याबरोबरच नदीपात्राची स्वच्छता आणि पूरनियंत्रणास मदत होणार आहे. पंचगंगेचे पात्र गाळाने भरल्यामुळे पूराची इशारा पातळी व धोका पातळी वेगाने ओलांडली जावून मळेभागात पूराचे पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पंचगंगा नदीतील अतिरिक्त गाळ काढण्यात येऊन पात्राची खोली वाढविण्याची गरज असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
त्यावर मंत्री पाटील यांनी इचलकरंजी शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही व नियोजन करण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. पंचगंगा नदी गाळमुक्त होण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडले असून महापूराचा भेडसावणारा प्रश्नही संपुष्टात येणार आहे.बैठकीस महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, मंत्रालयीन अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.