डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

जयसिंगपूर: राम आवळे 

दि.२९:  औषधांचा सुरक्षित व योग्य वापर, रुग्णांचे समुपदेशन तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया – महाराष्ट्र राज्य (ए.पी.टी.आय.-एम.एस.) शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी औषधांचा योग्य वापर, आरोग्यविषयक जनजागृती आणि फार्मासिस्टची सामाजिक जबाबदारी यावर आधारित प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. औषधे घेताना वैद्यकीय सल्ला तसेच फार्मासिस्टचे मार्गदर्शन घेणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश पथनाट्यातून प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी महाविद्यालयात राज्य स्तरावरील ई-पेशंट कौन्सिलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. प्रांजल धांडे (एस.के. बी. कॉलेज, गाडा कामठी, नागपूर), द्वितीय क्रमांक कु. जानवी निर्मळ (डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज, जयसिंगपूर) तर तृतीय क्रमांक कु. सृष्टी पाटील (ए.डी.सी.पी., आष्टा) यांनी मिळविला. विजेत्यांना बक्षीस रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  विजेत्यांना प्रमुख पाहुणे के.डी.सी.ए.चे अध्यक्ष तथा एम.एस.सी.ए.चे संघटन सचिव श्री. मदन के. पाटील यांच्या हस्ते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच कोल्हापूर ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन, कोल्हापूरचे संचालक यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे श्री. मदन के. पाटील यांनी फार्मासिस्टच्या कार्यातील रुग्ण समुपदेशनाचे महत्त्व, औषधांचा सुरक्षित वापर आणि औषधांविषयी योग्य माहिती देण्याची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना आरोग्यसेवा क्षेत्रात भारताचे योगदान अधोरेखित केले. कार्यक्रमासाठी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. स्नेहल पाटील, प्रा. सुधीर लंगरे आणि प्रा. सौरभ समडोळे यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.