देश समृध्द होणेसाठी संशोधन वृत्ती जागृत होणे आवश्यक

यड्राव : विजय घंगेकर

दि. १० डिसेंबर : देश समृध्द होणेसाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करायला हवे. राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि अविष्कार प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य आहे. तत्कालिन राज्यपाल यांनी अविष्कार स्पर्धा सुरु करुन प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य केले आहे. असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत ‘अविष्कार 2022’ हि संशोधन प्रोजेक्ट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, देशाला महासत्ता करण्याची क्षमता ग्रामिण तरुणांच्यामध्ये आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळते. विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत अशा स्पर्धा पोहचवावेत. अशा स्पर्धेतून विचारांची देवाण-घेवाण होते.

या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंध्दुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील 35 महाविद्यालयातून 100 पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. यावेळी प्राचार्य डॉ. संजय खोत यांनी अविष्कार स्पर्धा याची माहिती दिली.

यामध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तेतर अशा तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर सहा क्षेत्रांमध्ये विद्यार्थी त्यांच्या संशोधनाची मांडणी केली होती. विविध क्षेत्रातील परिक्षकांनी परिक्षण केले. यावेळी विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी उपस्थीत होते.

स्वागत डॉ. शरद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीपा कारवा यांनी केले. आभार प्रा. धनश्री बिरादार यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.