बाबरे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; १५२ नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
बाबरे: प्रतिनिधी
दि १५ : ए.बी.एम. समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुला-मुलींची अनुदानित आश्रमशाळा, बाबरे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर येथील प्रतिनिधी सी. आर. सोनावणे (गृहपाल, खर्डी), संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या चेअरमन पूनम भडांगे, प्राथमिक विभागाचे कार्यकारी चेअरमन संतोष पडवळ तसेच जीवनसंघर्षकार व साहित्यिक नवनाथ रणखांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रवेशोत्सवानिमित्त नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवाच्या दिवशीच एकूण १५२ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन शाळा, नवीन मित्र आणि नव्या शैक्षणिक प्रवासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी शाळेतील विविध सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि शिस्तीचे नियम यांची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण म्हणून शाळेत सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. नवीन गणवेश आणि हातात पाठ्यपुस्तके घेऊन विद्यार्थ्यांनी उत्साहाने छायाचित्रे काढत शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी जतन केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षिका सुप्रिया भोईर यांनी केले, तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कपिल सातपुते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले.प्रवेशोत्सवामुळे संपूर्ण आश्रमशाळा परिसर आनंद, उत्साह आणि नव्या शैक्षणिक उमेदीने भारावून गेला होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.