लांजा येथील रिगल कॉलेजचा बोगस कारभार
विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणुक;कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
लांजा :नसिर मुजावर
दि.७ :कोरोनामुळे वर्षभर काॅलेज बंद असतानाही येथील रिगल काॅलेजकडून पूर्ण फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती केली जात असून फी भरल्याशिवाय कागदपत्रे दिली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रिगल कॉलेज व संस्थेच्या बोगस कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लांजातील रिगल कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी दरवर्षीप्रमाणे गेल्यावर्षी सुद्धा नवीन प्रवेश घेऊन वर्ग सुरु केले गेले. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लांजा, राजापूरतालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे कॉलेजमध्ये वर्ग न भरवता शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन पद्धत वापरली गेली. परंतु हॉटेल मॅनेजमेंट हा विषय प्रॅक्टिकल्स बघून व करून शिकायचा असल्याने बऱ्याच विद्यार्थांना काहीच उपयोग न होता एका शैक्षणिक वर्षाचे नुकसानच झाले आहे. काही विद्यार्थांनी पूर्ण फी न भरता फक्त प्रवेश फी भरली होती. संबंधित विद्यार्थी वर्षभर लेक्चरला बसले नाहीत आणि परीक्षा सुद्धा दिल्या नाहीत. अश्या परिस्थितीत पालकांनी पुढच्या शिक्षणासाठी व दुसरीकडे प्रवेश घेण्यासाठी रिगल कॉलेजच्या ताब्यात असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठी मागणी केली असता रिगल कॉलेजकडून पूर्ण फी भरल्याशिवाय कागदपत्रे दिली जाणार नाहीत असे सांगून जबरदस्ती केली जात आहे. कॉलेज मधून सांगण्यात येत आहे की विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना काहीही पूर्वकल्पना न देता कॉलेजने स्वतःच्या फंडमधून विद्यार्थ्यांच्या उरलेल्या फी विद्यापीठाकडे भरल्या आहेत. परंतु पालकांनी रक्कम भरलेली फीची पावती बघण्यासाठी मागितल्याने ती दाखवता कॉलेजकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. खरच जर का कॉलेजकडून फी भरली असेल तर मग त्याबाबतीत पुरावे का दाखवले जात नाहीत? असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी एक वर्षाची पूर्ण फी भरून परीक्षा दिल्या आहेत. पण कोविड काळामुळे बऱ्याच पालकांना पुढचं शिक्षणाचा खर्च सोसत नसून आर्थिक अडचणी येत असल्याने मुलांना नोकरीचा पर्याय नाईलाजाने स्विकारावा लागत आहे आणि अश्या वेळी आवश्यक कागदपत्र कॉलेजमध्ये जमा आहेत आणि ती परत मिळवण्यासाठी उरलेल्या दोन वर्षांची फी सुद्धा भरा अशी उद्धट मागणी कॉलेजकडून होत आहे.
या संदर्भात प्रशासनाने त्वरित यात लक्ष घालून शासकीय प्रशासक नेमावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली आणि यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई न केली गेल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मिथिलेश देसाई यांनी दिला आहे. यावेळी निवदेन देताना जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई, तालुकाध्यक्ष चैतन्य अटक, दाजी गडहिरे आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.