स्व. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निषेध; गुहागर तालुका सरपंच संघटनेचे काम बंद आंदोलन

 

गुहागर:
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गुहागर तालुका सरपंच संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. ९ जानेवारी २०२५ रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकदिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या आवाहनानुसार घेण्यात आला आहे. गुहागर तालुका सरपंच संघटनेने गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, तहसिलदार प्ररिक्षित पाटील, आणि गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येमुळे राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य भयभीत झाले असून, गावगुंडांमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर सतत दबाव असतो. समाजसेवेचे कार्य करणे म्हणजे पाप आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
१. सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा लागू करावा.
२. प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण देणे अनिवार्य करावे.
३. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी.
४. देशमुख कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि त्यांच्या गावात स्मारक उभारावे.
५. सरपंचांना विमा संरक्षण आणि पेन्शन सुविधा लागू करावी.
६. ग्रामपंचायत मासिक बैठकीत कायद्याने विनापरवाना प्रवेशास मनाई करावी.

सरपंच हे लोकप्रतिनिधी असून, त्यांच्या कार्यासाठी सुरक्षित वातावरणाची गरज आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात गावगुंडांकडून अडथळे येऊ नयेत, यासाठी सरपंचांना शासकीय कामात अडथळ्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल होण्याची मागणीही करण्यात आली आहे.

९ जानेवारी रोजी होणाऱ्या या आंदोलनादरम्यान गुहागर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज बंद राहील. सरपंचांच्या सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.लोकप्रतिनिधींच्या संरक्षणासाठी घेतलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.