सातपुते परिवाराच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता

इचलकरंजी: विजय मकोटे
येथील सुतार मळा परिसरातील हभप स्व. दत्तोबा रंगोबा सातपुते यांचे घरी साजर्‍या होणार्‍या ६१ व्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.६१ वर्षापूर्वी भारत-चीन युध्दानंतर इचलकरंजी शहरामध्ये सार्वजनिक विश्‍वशांती प्रित्यर्थ शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला गेला. पुढे ही परंपरा सातपुते कुटुंबियांनी जबाबदारी स्विकारून सातत्याने गेली ६० वर्षे हा उत्सव सुरू ठेवला आहे. याठिकाणी पूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती बाळासाहेब भारदे, विधानपरिषदेचे अध्यक्ष वि. स. पागे, न्यायमूर्ती रानडे, आळंदीचे किसन महाराज साखरे, कराडचे संत फुटाणे, सांगलीचे श्री कोटणीस महाराज, कोल्हापूरचे श्री यादव महाराज यांचेसह ६० वर्षामध्ये शंभरपेक्षा अधिक प्रवचनकार, साधुसंत तसेच किर्तनकार यांनी या ठिकाणी येवून देवीपुढे आपली सेवा अर्पण केली आहे. या उत्सवाचा २५ वा सोहळा नामदार वि. स. पागे व संत फुटाणे यांचे उपस्थितीत झाला तर २५ वा उत्सव खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, ह.भ.प. वसंतराव कुलकर्णी, ह.भ.प. सदाशिवराव म्हेत्रे यांचे उपस्थितीत संपन्न झाला होता.
यावर्षीचा ६१वा उत्सव समारंभ भव्य प्रमाणात करणेचा मनोदय होता, पण कोरोना महामारीमुळे परवानगी न मिळाल्यामुळे सदरचा सप्ताह ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेणेत आला. यावेळी ह.भ.प. सुभाषराव मुणगेकर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर कडोलकर, ह.भ.प. सोमनाथ लामकाने, ह. भ.प. अशोक केसरकर, ह.भ.प. अशोक दास यांची प्रवचने झाली तर श्री ज्ञानेश्‍वरी पारायण श्री. प्रथमेश बुगड यांचे मार्गदर्शनाखाली आठ दिवसामध्ये काही महिला व पुरुष सेवेकरी पारायणास बसले होते त्याचा सन्मान व प्रमुखांचा सत्कार इचलकरंजी देवांग समाजाचे कार्याध्यक्ष आनंदराव साखरे यांचे हस्ते व महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सर्व सातपुते कुटुंबीय व परिसरातील भक्त हजर होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.