आचार्यश्री आनंद युवा मंचचा भुकेल्यांना दररोज आधार उपक्रम

आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्र

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि: १७:प्रत्येक अडचणीच्या काळात आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या आनंद गुरू मोफत चपाती-भाजी सेवा केंद्रास माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भेट दिली. मंचच्यावतीने सुरु असलेल्या या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत असे पुण्याचे कार्य घडत राहो, त्यामध्ये लागेल ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही श्री. हाळवणकर यांनी यावेळी दिली.
आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने भुकलेल्यांना दोन घास अन्न मिळावे या उद्देशाने प्रितम बोरा यांच्या संकल्पनेतून ही जनसेवा सुरु करण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षापासुन मंडळ मधील प्रत्येकाच्या घरून ताजी चपाती जमा करत एकाच्या घरून भाजी बनवून आठवड्यातून 2 दिवस बस स्थानक परिसरात हे कार्य सुरू केले. त्यावेळी सर्व सामान्यजन प्रवासी बांधवांना चपाती भाजी खाल्ल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर दिसणारा तृप्ततेचा भाव पाहून सर्वसामान्यांना त्यांच्या भुकेला आधार मिळावा म्हणुन हा उपक्रम सुरु केला. इचलकरंजी येथील बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी पंचक्रोशीतून प्रवाशांची ये-जा सुरु असते. त्याचबरोबर शहरात फिरस्त्यांची संख्याही मोठी असल्याने अनेकांना अन्नापासून वंचित राहण्याची वेळ येते. हीच गरज ओळखून मंचच्यावतीने हा जनसेवेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  दररोज जवळपास 250 लोकांना दोन चपाती व भाजी असे अन्न दिले जाते. अनेक व्यक्ती या जनसेवेचा लाभ घेत असून एकदिवसासाठी जवळपास 4000 रुपये इतका खर्च येतो. तर मंचच्यावतीने या कामासाठी 3100 रुपयांची 1 मिती म्हणुन देणगी स्विकारली जाते. शहरातील अनेक दानशूर व्यक्तींकडून या जनसेवेसाठी सहकार्य मिळत असून मोठा प्रतिसाद लाभत आहे.
या कामात आचार्य आनंदश्री युवा मंचचे राजेंद्र बोरा, रितेश चोपडा, जितेंद्र जैन, सुमित मुनोत, सुमतीलाल शहा, सुभाष गुगळे, पंकज बाबेल, प्रितम बोरा, राकेश बंब हे दररोज सेवा देतात. त्या व्यतिरिक्त मंडळमधील दररोज तिघेजण सात दिवसातून एकदिवस सेवा देतात. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून गरजवंतांना भूकेच्यावेळी अन्न देण्याचे पुण्यकर्म घडत असल्याबद्दल अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील, वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, संजय जाधव, दिलीप मुथा, भाऊसो आवळे, प्रविण पाटील, राहूल तेलसिंगे, मोहन मालवणकर तसेच शिवभक्त उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.