कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना–मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित जल्लोष
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि.६: संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्यानंतर राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद कडवई गटातही उमटले.
आज तुरळ येथील मुंबई–गोवा महामार्गावर कार्यकर्ते एकत्र जमले. फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी दोन्ही पक्षातील नेत्यांनी जुने मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.
मनसेचे जितेंद्र चव्हाण यांनी या वेळी बोलताना, “मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या नव्या घडणीसाठी उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आले आहेत. त्यांच्या पुढाकाराला बळ देण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करूया,” असे आवाहन केले.
शिवसेना (उबाठा) गटाचे विभागप्रमुख अनंत उजगावकर यांनीही “एकदिलाने संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे,” असे आवाहन केले.या कार्यक्रमाला विजय कुळेकर, उपविभागप्रमुख अरविंद जाधव, दत्ता लाखन, युवाधिकारी अजिंक्य ब्रीद, शाखाप्रमुख संदीप चिले, सुजित पडव, विष्णू इंजले, विजय दुदम, अशोक उजगावकर, प्रमोद शिंदे तसेच मनसेचे नंदकुमार फडकले, उदय चाचे, विजय बामणे, कृष्णा पाचकले, रघुनाथ येलोंढे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस एकतेचा नारा देत उपस्थितांनी भविष्यातील संघटनात्मक कार्याची दिशा ठरवली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.