पर्यावरणाच्या सन्मानाला हरताळ – गांधी चौकातील हिरवळीवर काँक्रीटचा मारा

इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी 

दि. २० जुलै –महात्मा गांधी चौकातील गांधीजींचा पुतळा सध्या दुरुस्तीसाठी हटवण्यात आला असून, गेल्या महिन्याभरापासून ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मात्र, या पुतळ्याच्या सभोवतालची हिरवळ हटवून तिथे काँक्रीटीकरण सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.ही हिरवळ या परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. अशा महत्त्वाच्या नैसर्गिक घटकाचा नाश करून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे, ‘महापालिकेचे पर्यावरणविषयक दावे फक्त कागदावरच मर्यादित आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

एकीकडे महापालिका ‘हरित शहर’ उपक्रमांतून पर्यावरणसंवर्धनाचे धडे देत आहे, तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी असे कृत्रिम हस्तक्षेप करून नैसर्गिक सौंदर्याचा नाश केला जात आहे. या विरोधाभासामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.गांधी चौकातील पुतळ्याचे स्थान केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर ते भावनिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्या सभोवताली असलेली हिरवळ नष्ट करून काँक्रीटचा वापर केल्याने शहरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

“या दुरुस्तीची गती धीम्या स्वरूपाची असली तरी ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’पूर्वी गांधीजींचा पुतळा पुन्हा आपल्या मूळ जागेवर उभा करावा आणि हिरवळीची पुनर्बहाली करावी,” अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.महापालिकेच्या या धोरणावर पुनर्विचार होणार का? आणि पर्यावरणाचे संतुलन राखत सांस्कृतिक वारसा जपला जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.