कुंभारखणीखुर्द येथे बिबट्या बाथरूममध्ये अडकला; वनविभागाने केली सुखरूप सुटका
संगमेश्वर :सचिन पाटोळे
दि .२६ :संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द गावात सोमवारी पहाटे एक अनोखी घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या थेट घराच्या बाथरूममध्ये अडकला. वनविभागाने तात्काळ कारवाई करत पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला सुखरूप पकडले व नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
घटना पहाटे साडेचार वाजता घडली. गावातील ऋषिकेश रामचंद्र भालेकर यांच्या घराच्या मागील बाथरूममध्ये बिबट अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील रविंद्र महाडिक यांनी वनविभागाला दिली. यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तपासणीअंती बाथरूममध्ये कुत्रा आणि बिबट दोघेही अडकले असल्याचे दिसून आले. वनकर्मचाऱ्यांनी दरवाज्याला लाकडी फळ्या ठोकून सुरक्षित पिंजरा लावला. बिबट पिंजऱ्यात गेल्यानंतर कुत्राही सुरक्षित बाहेर आला.वनविभागाने बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा नर बिबट असून वय साधारण आठ ते नऊ वर्षे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट पूर्णपणे तंदुरुस्त असल्याने त्याला जंगलात सोडण्यात आले.
सदर कारवाईत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सौ. सुप्रिया काळे, सुरज तेली, सौ. शर्वरी कदम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. ही मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.वनविभागाने आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.