इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक : महायुती एकत्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९ : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिथे महायुती जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत झाली.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय यापूर्वी झाला असला, तरी अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूर येथील आवाडे यांच्या निवासस्थानी हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून पहिला महापौर महायुतीचाच करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
जागावाटपाबाबत चर्चा करताना ज्या प्रभागांमध्ये महायुती शक्य आहे तिथे एकत्र लढायचे, तर जिथे अडचणी येतील तिथे मैत्रीपूर्ण लढत करण्यावर एकमत झाले. जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निश्चित केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.