मी जयसिंगपूरकर’ या भावनेतून विकासाचा संकल्प
नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांचा निर्धार
जयसिंगपूर, (राम आवळे)
दि. ५ :जयसिंगपूरच्या विकासाची गती अधिक वेगवान करत शहराला आदर्श नगरपालिकेच्या पंक्तीत नेण्याचा ठाम संकल्प नूतन नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देणे, त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी केला.
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात बोलताना नगराध्यक्ष पाटील-यड्रावकर म्हणाले की, निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द पाळत येत्या ९ तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जयसिंगपूरकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जवळपास नऊ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने सर्व २१ जागांवर निर्विवाद विजय मिळवला असून नगराध्यक्षांना राज्यात नवव्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाल्याने विकासाची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
आचारसंहिता संपताच शहरातील सर्व रस्त्यांची कामे सुरू केली जाणार असून, बारामतीच्या विकास मॉडेलप्रमाणे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मिती हे विकासाचे केंद्रबिंदू असतील. नगरपालिका शाळांचे डिजिटायझेशन, मॉडेल शाळांची उभारणी तसेच प्रस्तावित ८०० बेडच्या रुग्णालयामुळे शहराच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी ‘पक्ष नाही, शहर प्रथम’ या भूमिकेतून काम करत जयसिंगपूरला आदर्श शहर बनवण्यासाठी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.