आपल्या उत्पादनासाठी स्थानिक देशाची बाजारपेठ इतके मर्यादीत लक्ष्य न ठेवता जगभरातील निर्यात बाजारपेठेची व्यापक संधी साध्य करावी.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त रुपराशी महापात्रा यांचे आश्वस्त
इचलकरंजी:विजय मकोटे
दि:२८ इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात गुणवत्तापूर्ण जागतिक दर्जाची वस्त्रनिर्मिती होत आहे. त्याला इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरमधील अत्याधुनिक प्रोसेर्सची जोड देऊन आपली वस्त्र उत्पादने जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावेत. या माध्यमातून वस्त्रोद्योगाचा एक सक्षम इचलकरंजी ब्रॅण्ड आकारला येऊ शकतो, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त रुपराशी महापात्रा यांनी व्यक्त केले.
भारत सरकार, पिडीक्सिल टेक्स्टाईल व्हॅल्यु चेन आणि डीकेटीई यांच्या संयुक्त विद्यमाने कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न टेक्स्टाईल डेव्हलपमेंट अॅण्ड एक्सपोर्ट प्रमोशन या विषयावर आयोजित कॉन्फरन्समध्ये कोरोनातील अडचणीकडे लक्ष वेधत आयुक्त महापात्रा म्हणाल्या, कोरोनामुळे वस्त्रोद्योगाच्या बाजारपेठेवर परिणाम झाला असताना काही वेगळी उत्पादने करुन त्यावर मात करण्यात आली. या संकटातून मागणी कमी झाली तरी वस्त्रोद्योगाच्या उत्पादनांना बाजारपेठ कायम उपलब्ध असणार आहे हेही दिसून आले आहे. आपल्या उत्पादनासाठी स्थानिक देशाची बाजारपेठ इतके मर्यादीत लक्ष्य न ठेवता जगभरातील निर्यात बाजारपेठेची व्यापक संधी साध्य करावी. निर्यात बाजारपेठेत येणार्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी वस्त्रोद्योग विभाग उद्योजकांच्या पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करेल, असेही त्यांनी आश्वस्त केले.
वस्त्रोद्योग विभागाच्या सहाय्यक संचालिका उषा पोळ यांनी, टफस् अनुदान योजनेचा आढावा घेऊनवस्त्रोद्योजकांच्या अनुदानातील अडचणी सोडविल्या जातील असे स्पष्ट केले. माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजी हे जगातील विक्रेंद्रीत क्षेत्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. काळानुरुप वस्त्रनगरीने अत्याधुनिकता स्विकारली आहे. शहरात अनेक व्यापारी, उद्योजक एक्स्पोर्ट करत आहेत. ती संख्या सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असून ती वाढावी अशी अपेक्षा असून ते आता अवघड नाही. मिळेल त्याला काम देणार्या शहरात इचलकरंजी दुसर्या क्रमांकावर आहे. शहरात डीजीएफटी कार्यालय असणे गरजेचे असल्याचे सांगत ते म्हणाले, मोठ्या उद्योजकांना सोयी-सवलती, सुविधा दिल्या जातात, पण लहान उद्योगांना ती मिळत नाही. इचलकरंजी आज शटललेस यंत्रमागाचे हब बनले असून त्यामध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे मोलाचे योगदान आहे. इचलकरंजीतील इंडस्ट्रीज टॉप असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही टॉपची बनावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये निश्चितपणे यश मिळण्याबरोबरच आगामी चार वर्षात इचलकरंजीतून 10 हजार कोटीचे एक्स्पोर्ट करुन दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी डीकेटीई चे प्राचार्य डॉ. पी.व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पिडीक्सिलचे चेअरमन सुनिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी जॉईंट टेक्स्टाईल कमिशनर एस. पी. वर्मा व विभागीय उपसंचालक एस.के. सिंघ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, गारमेेंट क्लस्टरचे संचालक स्वप्निल आवाडे, पिडीक्सिलचे व्हा.चेअरमन विश्वनाथ अगरवाल, टेक्स्टाईल व्हॅल्यु चेन पब्लिशर श्रीमती जिग्ना शाह, ट्रेड डेव्ह. ऑफिसर सुरेश दापोदकर, जनरल मॅनेजर आनंद सिंघ, इसीजीसी चे विष्णू खानोलकर, स्टॅन्डन कन्सल्टींग सीईओ शरद टंडन, इनोवेशन अॅडव्हाईजर जगत शहा, सीएमएआय चे चीफ मेन्टोर राहुल मेहता, निकुंज बगाडिया, जनता बँकेचे व्हा. चेअरमन चंद्रकांत चौगुले, संचालक अशोक सौंदत्तीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत, प्रकाश सातपुते यांच्यासह टेक्स्टाईल विभागातील तज्ञ व मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.