जिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणी

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.१५ : जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमित तपासणीपासून वंचित राहणाऱ्या तसेच अतिजोखमीच्या गटांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. विटभट्ट्या, स्थलांतरित लोक, बांधकाम मजूर, निवासी व आश्रम शाळा, भिक्षागृहे, खाणकामगार, कारागृहातील कैदी व औद्योगिक कामगार अशा ५८७ अतिजोखमीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली.

नुकत्याच राबवण्यात आलेल्या या कुष्ठरोग शोध मोहिमेअंतर्गत एकूण ४५,५८९ नागरिकांची आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. या व्यापक सर्वेक्षणादरम्यान संशयास्पद रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली असता एकूण १४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये आजाराच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण केले असून, त्यापैकी ५ रुग्ण एम.बी. (MB) गटातील असून त्यांच्यात आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे निदान झाले आहे. सर्व बाधित रुग्णांना तातडीने आरोग्य केंद्रांमार्फत आवश्यक औषधोपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे. वेळेत निदान झाल्यामुळे या रुग्णांना पूर्णपणे बरे करणे आणि संसर्गाचा पुढील प्रसार रोखणे आता शक्य होणार आहे. आरोग्य विभागामार्फत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचीही खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे.मोहिम यशस्वी करण्यासाठी एकूण ४४८ पथकांची निवड करून तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक पथकात एक पुरुष स्वयंसेवक व एक आशा स्वयंसेविका असून पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक तर महिलांची तपासणी आशा स्वयंसेविकांमार्फत करण्यात आली. या मोहिमेत ४५,५८९ लोकसंख्येची तपासणी करण्यात आली होती. संशयित रुग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, कुष्ठरोग जनजागृती अभियाना अंतर्गत २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीत ग्रामसभा, प्रतिज्ञा वाचन व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन वाचन करण्यात आले. ३० जानेवारी कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त नर्सिंग कॅडरची कार्यशाळा घेण्यात आली. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पंधरवडा साजरा करत शाळांमध्ये प्रभात फेरी, प्रतिज्ञा, सपना संदेश व विविध उपक्रम राबविण्यात आले. नुक्कड नाटिका, रांगोळी, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी, आरोग्य व त्वचारोग शिबिरे, महिला मेळावे तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या कार्यशाळांद्वारे समाजात जागृती करण्यात आली.कुष्ठरोग हा त्वचा व मज्जासंस्थेला बाधित करणारा आजार असून त्वचेवर बधीर चट्टे, संवेदनाशून्यता, हात-पायांमध्ये मुंग्या येणे, शक्ती कमी होणे, न बरी होणाऱ्या जखमा ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराचे निदान व बहुविध औषधोपचार (एम.डी.टी.) सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यांत मोफत उपलब्ध असून कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत कोणाला संशयित लक्षणे असल्यास घाबरून न जाता जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखवा. लवकर निदान आणि उपचार करून हा आजार बरा करता येतो. २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हेमलता पालेकर यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.