हनुमान जयंतीनिमित्त रातांबीत धार्मिक सोहळ्यांसह अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश

संगमेश्वर : सचिन पाटोळे 

दि .२९  :तालुक्यातील मौजे रातांबी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदाच्या उत्सवाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ ते गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या या उत्सवात वीणा पूजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, जन्मकाळ सोहळा, सत्यनारायण महापूजा तसेच काल्याचे कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय श्री केदारनाथ आशीर्वाद नमन मंडळ, सावर्डे भुवडवाडी यांचे नमनही सादर होणार आहे.

उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक कार्यक्रमांसोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जादूटोणाविरोधी कायदा, अंधश्रद्धा व फसवणुकीपासून बचाव याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, काही तथाकथित बाबा, बुवा, मांत्रिक व ज्योतिषी यांचे चमत्कार प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे उलगडून दाखवले जाणार आहेत. या प्रयोगांमागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत स्पष्ट करून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न होणार आहे.

धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक विचार यांचा समतोल साधत समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पवित्र सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. मौजे रातांबी ग्रामस्थ, पुणेकर मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.