अमित शहा यांच्या प्रस्तावित इचलकरंजी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांची दौरा मार्गाची पाहणी

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.१६  : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित इचलकरंजी दौऱ्याच्या अनुषंगाने शहरातील तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दौरा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी उपायुक्त नंदू परळकर, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर तसेच संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रभाग समिती कार्यालय ‘क’, कोल्हापूर रोड, ए.एस.सी. कॉलेज, छत्रपती शाहू महाराज पुतळा, इंडस्ट्रियल इस्टेट, जुने एस.टी. स्टँड परिसर आणि के.ए.टी.पी. मैदान या दौरा मार्गावरील विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली.


पाहणीदरम्यान आयुक्तांनी रस्त्यांची स्थिती, स्वच्छता व्यवस्था, पथदिवे, वाहतूक नियोजन, सुशोभीकरण तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. दौरा मार्गावरील आवश्यक दुरुस्तीची कामे, स्वच्छता मोहीम आणि नागरी सुविधांशी संबंधित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
दौऱ्यादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले. विविध चौक, प्रमुख रस्ते आणि कार्यक्रमस्थळ परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबतही सूचना करण्यात आल्या.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी युद्धपातळीवर सुरू असून शहर स्वच्छ, सुशोभित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी सहायक आयुक्त नितीन बनगे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख धनंजय पळसुले, सहायक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक संग्राम भोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, स्वच्छता निरीक्षक सचिन भुते, उमेश कांबळे, सूरज पांगरे आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.