इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित लोककल्याण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि.२६: इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण मेळाव्याचे उद्घाटन उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपायुक्त अशोक कुंभार, सहा आयुक्त सुनिल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.


राजीव गांधी भवन येथे आयोजित या मेळाव्यात प्रधानमंत्री स्वनिधी (PMSVANidhi) योजना तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या मेळाव्याद्वारे पात्र लाभार्थ्यांना पी.एम. मातृ वंदना योजना, पी.एम. जीवन ज्योती विमा योजना, पी.एम. जनधन योजना, पी.एम. जननी सुरक्षा योजना, पी.एम. सुरक्षा विमा योजना, पी.एम. श्रमयोगी मानधन योजना, वन नेशन वन रेशन कार्ड योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पात्र पथविक्रेत्यांना कर्ज सुविधा व डिजिटल व्यवहारांवर कॅशबॅकचा लाभ मिळण्याबाबतही माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या लोककल्याण मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर लोककल्याण मेळाव्यात प्रधानमंत्री स्वनिधी (PMSVANidhi) योजना यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या बँका १. भारतीय स्टेट बँक,२.बँक ऑफ बडोदा,३.बँक ऑफ इंडिया , ४.बँक ऑफ महाराष्ट् व ५.ICICI बँक यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच ज्या बचत गटांनी उत्तम पद्धतीने गट चालवून घेतलेल्या कर्जाची व्यवस्थित परत फेड केली आहे, अशा गटाचाही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.या मेळाव्यास शहरातील पथविक्रेते, नागरिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी एन.यु.एल.एम. व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे व समुदाय संघटक सुरेश कांबळे, सन्मित निंबाळकर व प्रीती सूर्यवंशी तसेच शुभांगी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.