मुलाला ‘आई कधी येणार?’ असे विचारताच संताप; पतीच्या हातावर खुर्प्याने वार
चंदूर : हबीब शैखदर्जी
दि.१३: त्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीने मुलाला ‘तुझी आई कधी येणार?’ असे विचारल्याचा जाब विचारल्याने संतप्त होत पतीच्या डाव्या हाताच्या तळहातावर लोखंडी खुर्प्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना चंदूर येथे रविवारी (दि. १३) सकाळी घडली. याप्रकरणी विशाल प्रभाकर कांबळे (वय ३५, रा. सिद्धार्थनगर गल्ली नं. ३, वडर गल्ली, चंदूर) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जितेंद्र तुकाराम वडर (वय ३६, रा. सिद्धार्थनगर गल्ली नं. ३, वडर गल्ली, चंदूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वडर यांच्या पत्नीचे आरोपी विशाल कांबळे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा जितेंद्र यांना संशय होता. यावरून ५ मे २०२६ रोजी पत्नी आरोपीसोबत बोलत असताना आढळून आल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली होती.
दरम्यान, रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जितेंद्र यांच्या घरासमोरील अंगणात त्यांचा मुलगा शौर्य खेळत होता. त्यावेळी आरोपी विशाल याने शौर्यला ‘तुझी आई कधी येणार आहे?’ असे विचारले. ही बाब समजल्यानंतर जितेंद्र यांनी आरोपीला याचा जाब विचारला.
यावेळी संतापलेल्या विशालने हातातील लोखंडी खुर्प्याने जितेंद्र यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर वार केला. हल्ल्यात जितेंद्र गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीने जितेंद्र व त्यांच्या आईला शिवीगाळ केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी जितेंद्र यांना उपचारासाठी आय.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दिलेल्या दवाखाना जबाबावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ७८२/२०२६, भा. न्या. सं. कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हेड कॉन्स्टेबल १३१६ शिंदे तपास करीत असून, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.