जुन्नर येथे 19 ते 21 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी

पुणे,प्रतिनिधी

दि. 17 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे 19 ते 21 फेब्रुवारी या काळात दिवस द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन आदीचे आयोजन करण्यात आले आहे.

जुन्नर मध्ये आयोजित द्राक्ष महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कलाकुसर करणारे कारागीर, बचतगट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल. यामध्ये विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. महोत्सवामुळे पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था असणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.