बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला संघटित

खेर्डीत नारी महोत्सवात आ. शेखर निकम यांचे प्रतिपादन

चिपळूण : सचीन पाटोळे

दि. ३ मे .बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला संघटीत होत आहेत. या गटांना आता वस्तूंच्या उत्पादनाची अडचण नाही. उप्तादनात त्या खूप पुढे गेल्या आहेत. आता त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. बचत गटाच्या महिला ज्या-ज्या वस्तू निर्माण करतात. त्यांचा प्रचार व प्रसार गावस्तरावर व्हायला हवा. प्रचार प्रसिद्धीची मोहिम ग्रामस्थांनीच हातात घ्यायला हवी. घरी कोणी नातेवाईक, पाहुणे आले तरी त्यांना गटाच्या उप्तादनांची माहिती द्यायला पाहीजे. एखाद्याला भेटवस्तू देताना बचत गटांची उत्पादने द्यावीत. यातूनच खऱ्या अर्थाने महिलांना चांगली बाजारपेठ मिळेल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी खेर्डीतील नारी महोत्सवात केले.
खेर्डी ग्रामपंचायत आणि सुकाई महिला महासंघाच्या वतीने नारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खेर्डीतील आठवडा बाजाराच्या जागेत ४ दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. शुक्रवारी २९ रोजी आमदार शेखर निकमांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन झाले. ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि लेझीम पथकाच्या साह्याने आमदार निकमांचे स्वागत करण्यात आले. महोत्सवात सुमारे ३० हून अधिक गटांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. माजी सभापती स्नेहा मेस्त्री यांनी महोत्सवाचा हेतू स्पष्ट करित गेल्या १२ वर्षात महोत्सवास दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. यानिमीत्ताने कोरोना कालावधीत योगदान देणाऱ्या खेर्डीतील २४ डॉक्टरांना तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी महिला बचत गटांच्या कामाचे कौतुक केले. या महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी खेर्डीत स्वतंत्र वास्तू उभारणे आवश्यक आहे, याकामी आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी केली. आमदार शेखर निकम म्हणाले, सावर्डेतील नारी महोत्सवाची प्रेरणा घेऊन जयश्री खताते, स्नेहा मेस्त्री यांनी २०१० मध्ये खेर्डीत महोत्सव सुरू केला. महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी उप्तादीत केलेल्या वस्तू लोकांपुढे नेण्यांची संधी मिळते. विक्री किती होते यापेक्षा प्रचार जास्त होतो हे महत्वाचे. प्रचार आणि प्रसिद्धीमुळे लांब-लांबच्या ठिकाणाहून गटांच्या वस्तूंना मागणी मिळत आहे. महिलांना उप्तादनाची अडचण नाही. उमेदच्या माध्यमातून हजारो महिला संघटीत होत आहेत. मार्केटींगचे वेगवेगळे सोअर्स निर्माण केले पाहीजेत. गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी मार्केंटींग व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी लागेल. यासाठी गावस्तरावर गटाच्या मालाची प्रचार आणि प्रसिद्धी करण्याची आवश्यकता आहे. माऊथ पल्बिसिटी जेवढी जास्त होइल, तेवढा गटांच्या मालाचा चांगला प्रचार आणि प्रसार होणार आहे. गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्यासाठी ग्रामपंचायतींनीही गावस्तरावर पुढाकार घ्यायला हवा. रत्न सिंधू योजनेसाठी ४५० कोटीचा निधी मिळाला आहे. सुदैवाने या समितीवर आपण आहोत. नजिकच्या काळात या योजनेतून महिला बचत गटांसाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबवले जातील. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉंलला भेटी देत महिलांचे कौतुक केले. २ मे पर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. विक्री आणि प्रदर्शना सोबत महिलांचे विविध सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे, माजी सभापती रिया कांबळे, सरपंच वृंदा दाते, उपसंरपच विनोद भूरण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, विजय शिर्के, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, प्रकाश पाथरूड, महासंघाच्या अध्यक्षा सौ. कापडी, जयश्री खताते, काशिनाथ दाते, बाळा दाते, ओवी शेट्ये, प्रणाली दाभोळकर यांच्यासह बचत गटांच्या महिला, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.